सांगलीतील वृद्धास सहा लाखांचा गंडा  
सांगली

Sangli News : सांगलीतील वृद्धास सहा लाखांचा गंडा

बँकेतून बोलत असल्याचे सांगून मोबाईल हॅक केला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करून एका निवृत्त वृद्धाची गोपनीय माहिती मिळवत सायबर भामट्याने त्यांचा मोबाईल हॅक केला. त्यानंतर त्यांच्या बँकेतील मुदत ठेव आणि बचत खात्यातील तब्बल 6 लाख 17 हजार रुपयांची रक्कम परस्पर लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उमेश त्रिंबक श्रोत्री (वय 68, रा. राधाकृष्ण वसाहत, डॉ. आंबेडकर रस्ता, सांगली) यांनी सांगली सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रोत्री हे निवृत्त असून सध्या घरात एकटेच राहतात. त्यांचे इंडसइंड बँकेत खाते आहे. त्यांनी या खात्यावर सात मुदत ठेवी (एफडी) केल्या होत्या. तसेच त्यांच्या बचत खात्यामध्ये 43 हजार रुपये शिल्लक होते. 14 मे रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास श्रोत्री यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने इंडसइंड बँकेतून बोलत असल्याचे हिंदी भाषेत सांगितले. ‌‘तुमचे नेट बँकिंग सुरू करण्यासाठी माहिती हवी आहे‌’, असे सांगून त्याने श्रोत्री यांच्याकडून त्यांचे पूर्ण नाव, जन्मतारीख, बँक खाते क्रमांक आणि डेबिट कार्डचा नंबर मागून घेतला.

श्रोत्री यांनी बँकेचाच फोन समजून सर्व माहिती दिल्यानंतर काही वेळातच त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर भामट्याने त्यांच्या एफडी मधून सुरुवातीला 79 हजार रुपये, त्यानंतर 1 लाख 48 हजार रुपये आणि 3 लाख 90 हजार रुपये असे टप्प्याटप्प्याने एकूण 6 लाख 17 हजार रुपये कापून अन्य खात्यात वर्ग केले. बँक खात्यातून रक्कम परस्पर हडप झाल्याचे समजताच श्रोत्री यांना धक्का बसला. हा प्रकार रात्रीच्या सुमारास निदर्शनास आला, तोपर्यंत बँक बंद झाली होती.

श्रोत्री यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तातडीने बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सायबर क्राईमच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवून सायबर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT