तासगाव : सावर्डे (ता.तासगाव) येथील येथील फुटका घाणा परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने द्राक्षबाग पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.२०) दुपारी घडली. आगीत राहूल दिलीप पाटील यांच्या मालकीची एक एकर द्राक्षबाग पूर्णपणे जळून खाक झाली. राहूल पाटील यांचे अंदाजे २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. घटनेमुळे सावर्डे परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे.
गावातील गट नंबर ६६६ मध्ये राहूल पाटील यांची ‘अनुष्का’ या जातीची सुमारे १ हजार ४५० झाडांची द्राक्षबाग आहे. प्रत्येक झाडावर २० ते २५ घड लागले होते. अंदाजे ३ हजार ५०० ते ४ हजार पेटी दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन अपेक्षित होते. फळ छाटणीला ६० दिवस पूर्ण झाले होते. बागेतील द्राक्षे तोडणीसाठी सज्ज अवस्थेत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
द्राक्षबागेमध्ये तणनाशक फवारणीमुळे गवत वाळलेले असल्याने आगीने लवकर पेट घेतला. आगीत पूर्ण द्राक्षमाल, झाडे, ठिबक सिंचन व्यवस्था तसेच बागेभोवतीच्या काट्या पूर्णपणे जळून नष्ट झाल्या आहेत. द्राक्षबागेचे मालक राहुल दिलीप पाटील एका मार्केटिंग कंपनीत कार्यरत असून कामानिमित्त गुजरात येथे गेले होते. बागेत मालक नसल्याची संधी साधूनच अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. राहूल पाटील गावी परत येताच अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. तलाठी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी पंचनामा केला. मेहनतीने फुलवलेली द्राक्षबाग एका क्षणात नष्ट झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र भावना व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.