अवैध विद्यार्थी वाहतूक; ११ वाहनांवर कारवाई 
सांगली

Sangli News : अवैध विद्यार्थी वाहतूक; ११ वाहनांवर कारवाई

रिक्षा, व्हॅन चालकांना दंड; मोहीम सुरूच ठेवण्याचा आरटीओंचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शाळकरी मुलांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सांगली शहर परिसरात रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ११ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली.

अपुऱ्या कागदपत्रांसह शालेय विद्यार्थी वाहतूक नियमबाह्यपणे करणे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवणे आणि सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने यापुढे तीव्र कारवाई केली जाईल. मंगळवारच्या मोहिमेत प्रामुख्याने रिक्षा आणि व्हॅन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही अशी अवैध वाहतूक आढळल्यास वाहने थेट जप्त करण्याचा इशारा आरटीओ प्रशासनाने दिला आहे. याबाबत प्रसाद गाजरे म्हणाले, प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांनी पालक-शिक्षक संघात चर्चा करून पालकांच्या सभेत शाळा वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर ठेवावा व पालकांचे प्रबोधन करावे.

आरटीओंचे आवाहन...

  • मुलांचा शाळाप्रवास सुरक्षित ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर पालक आणि शाळांचीही संयुक्त जबाबदारी आहे.

  • किरकोळ आर्थिक सोयीसाठी किंवा निष्काळजीपणामुळे मुलांच्या जिवाशी खेळ करू नये.

  • पाल्याला शाळेत पाठवताना संबंधित वाहन अधिकृत आहे का, याची पालकांनी खात्री करावी.

  • प्रत्येक शाळेने 'शालेय परिवहन समिती'अंतर्गत दरमहा वाहतूक

  • व्यवस्थेचा आढावा घ्यावा.

  • अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शाळा परिसरात बंदी घालावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT