अंकुश माकोडे 
सांगली

Pudhari EduDisha| आत्मविश्वासाने सारे शक्य : अंकुश माकोडे

नोकरदार होण्यापेक्षा अधिकारी व्हा...

पुढारी वृत्तसेवा

सांगली : करिअर निवडतानाच दक्ष राहा. आपली आवड कशात आहे ते पाहा. आपली क्षमता ओळखा. एकदा का तुम्ही निश्चय केलात आणि आत्मविश्वासाने फोकस केलात, तर सारे शक्य आहे, अशी भावना स्पेक्ट्रम अकॅडमी, नाशिकचे अंकुश माकोडे यांनी व्यक्त केली.

कच्छी जैन भवन येथे सुरू असलेल्या दैनिक ‘पुढारी’च्यावतीने आयोजित 'एज्युदिशा २०२६' या खास शैक्षणिक प्रदर्शनात ते बोलत होते. स्पर्धा परीक्षा आणि त्याची तयारी याबाबत माकोडे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रदर्शनाला पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

ते म्हणाले, करिअर निवडतानाच काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपणाला नोकरी करायची आहे, की अधिकारी व्हायचे आहे, ते ठरवण्याचा हाच काळ असतो. दहावी, बारावीनंतरच करिअरला योग्य दिशा द्यावी लागते. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होता येते. अगदी ज्यांना ३५ टक्के गुण मिळतात, ते लोकही अधिकारी झालेले दिसतात. याचा अर्थ समजून घ्या. स्वत:वर विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

घरात दोन वस्तू कमी घ्या, पण मुलांसाठी भरपूर पुस्तके खरेदी करा. मुलांना चांगल्या संगतीत ठेवा. महत्त्वाचे म्हणजे मोबाईलपासून दूर ठेवा. मोबाईलवर मुलं काय बघतात, यावरही त्यांची मानसिकता घडत असते. मुलं लगेच रागावतात, याचे कारणही रिल्सच असतात. अवांतर वाचन वाढवा, असे आवाहन माकोडे यांनी केले.

युपीएससीतून आयआरएस, आयपीएस, एनडीए, सीएपीएफ, सीडीएस आणि इतर विभागात तसेच एमपीएससीमधूनही ३२ प्रकारची अधिकारी पदे मिळू शकतात. पण त्यासाठी अगोदर आपली शारीरिक, बौध्दिक क्षमता ओळखा.
- अंकुश माकोडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT