वारणाली हॉस्पिटल  
सांगली

Sangli News : वारणाली हॉस्पिटल चालवायला देण्यास विरोध

उपमहापौरांचा जनआंदोलनाचा इशारा : सत्ताधारी, विरोधी नगरसेवक गप्प का? सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेचे वारणाली येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल भाडेकराराने चालविण्यास देण्याच्या प्रस्तावावर शहरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमहापौर गजानन मगदूम यांनी या प्रस्तावाविरोधात थेट जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, महापालिकेचे बहुसंख्य पदाधिकारी, सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांच्या या विषयावरील मौनावर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महापालिकेच्या या खासगीकरणाच्या प्रस्तावाविरोधात लवकरच स्वतंत्र कृती समिती स्थापन करून लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेने वारणाली येथील नव्याने उभारलेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर खासगी संस्थेकडे चालविण्यास देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रस्तावावरून नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. उपमहापौर गजानन मगदूम म्हणाले, वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल भाडेकराराने देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव अतिशय दुर्दैवी आहे.

उद्घाटनापूर्वीच हॉस्पिटल खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याच्या प्रशासनाच्या हालचाली संताप आणणाऱ्या आहेत. केवळ ७ ते ८ कोटी रुपयांचा वार्षिक बोजा वाढतो म्हणून हा निर्णय घेणे म्हणजे कर्तव्यापासून पलायन करण्यासारखे आहे. महापालिका क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ खासगी डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये दिवसातील काही वेळ विनामोबदला सेवा देण्यास तयार आहेत. या हॉस्पिटलसाठी आवश्यक सर्व तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व तंत्रज्ञांची नेमणूक शासन निधीतून व्हावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

रुग्णालय शासनाकडे वर्ग करा : शशिकांत गायकवाड

सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गायकवाड म्हणाले, "माजी आमदार शरद पाटील यांच्या प्रयत्नातून अनेक अडथळे पार करत शासनाच्या मंजुरीने या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. महापालिकेने शासनाच्या मदतीने या प्रकल्पावर सुमारे १५ कोटी रुपये खर्च केले आहेत. हॉस्पिटलची सुमारे दीड एकर जागा आणि इतर मालमत्ता मिळून याचे एकूण मूल्य ३५ कोटी रुपयांच्या घरात आहे. अशा परिस्थितीत हे हॉस्पिटल ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव पूर्णपणे चुकीचा आहे. महापालिकेने हे हॉस्पिटल स्वतः चालवावे किंवा महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करावे; मात्र कोणत्याही परिस्थितीत ते खासगी संस्थेकडे सोपवू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT