मान्सूनपूर्व पावसाने सांगली शहराची दैना 
सांगली

Sangli Rain : मान्सूनपूर्व पावसाने सांगली शहराची दैना

आठ झाडे उन्मळून पडली; शहर अंधारात

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली शहर व परिसराला रविवारी सायंकाळी सुमारे सव्वातास मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. जोरदार वाऱ्यामुळे शहरात सात ते आठ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विश्रामबाग येथील विद्युत केंद्रासमोरील ३३ के.व्ही. विद्युत वाहिनीवर झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन संपूर्ण शहर अंधारात बुडाले. क्रीडांगणांना तलावाचे स्वरूप आले. जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे सव्वातास हा पाऊस कोसळला. त्यानंतर उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरूच राहिली. जोरदार वाऱ्यामुळे विजयनगर, नेमिनाथनगर, सह्याद्रीनगर, धामणी रोड शंभरफुटी रोड, मार्केट यार्ड परिसर, अशा सात ते आठ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विश्रामबाग येथील विद्युत केंद्रासमोरील विद्युत वाहिनीवर झाडाची मोठी फांदी पडल्याने तारा तुटल्या. यामुळे विश्रामबाग, माधवनगर, औद्योगिक वसाहत वगळता संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झाला.

महापालिका आणि वीज वितरण कंपनीच्या पथकांद्वारे मार्ग मोकळे करण्याचे आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. विजयनगर, नेमिनाथनगर येथील रस्त्यावर पडलेले झाड अग्निशमन दलाच्या पथकाने दूर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्‍याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी रोहित मस्के यांनी दिली. विजेच्या तारांवर पडलेल्या फांद्या दूर करण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT