सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा व दोन नगरपंचायतींच्या सदस्य पदांसाठी व थेट नगराध्यक्षपदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्यास आज, सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पॅनेल निश्चिती, उमेदवार निश्चिती, यासाठी राजकीय नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. इतर पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोपांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता स्थगित होईल. आटपाडी नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत असल्यामुळे चुरस वाढली आहे.
निवडणुकीनिमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एकमेकांविरोधात कट्टर असलेले एकत्र येत आहेत, तर एकत्रित असलेले फुटून दुसऱ्या पक्षात जात आहेत. जत येथे माजी आमदार विक्रम सावंत व सांगली बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे हे कट्टर राजकीय विरोधक अनेक वर्षांनंतर एकत्र आले आहेत. माजी खासदार संजय पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांना साद घातली आहे. भाजपविरोधात महाविकास आघाडी करण्यासंदर्भात त्यांची आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्याशी बोलणी सुरू आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांना वगळून भाजपतर्फे तासगाव येथे स्वतंत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात तयारी सुरू केली आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर चुरस आणखी वाढणार आहे.