पेड सिंचन योजनेची गळती चार वर्षे कायम 
सांगली

Sangli News : पेड सिंचन योजनेची गळती चार वर्षे कायम

शेतकऱ्यांनी केला पंचनामा; गेली पाच वर्षे गळती निघेना

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : पेड (ता. तासगाव) येथील तलावातून सायफन पद्धतीने शेतीला पाणी देण्यात येणाऱ्या जलवाहिनीची गळती काढण्यात जलसिंचन विभागाला पाच वर्षे झाली तरी यश आलेले नाही. दरम्यान, त्यामुळे तलावात पाणी असूनही पिकांना पाणी मिळेना, म्हणून लाभधारक शेतकऱ्यांनी प्रभाकर पाटील यांच्यासमवेत संबंधित जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्या कामाबद्दल जाब विचारण्यात आला. दहा कोटी रुपये खर्च करून या योजनेचे काम पूर्ण केले असले तरी, गेल्या पाच वर्षांत जलवाहिनीला असणारी मोठी गळती काढण्यात जलसिंचन विभागाला अपयश आले आहे.

तत्कालीन खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून 10 कोटी रुपये निधी खर्च करून पेड तलावातून पेड, मोराळे, मांजर्डे, गौरगाव या गावांतील पिकांना सायफन पद्धतीने पाणी दिले जाणार आहे. ठेकेदाराने चार वर्षांपूर्वी पेड तलावातून जलवहिनी टाकत असताना केलेल्या खोल खोदाईमुळे जलवाहिनीची गळती निघाली नाही. जलवाहिनी पूर्ण झाली असती, तर ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे योजना पूर्ण क्षमतेने चालण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

जलवाहिनीच्या गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना त्याचा फटका बसला आहे. योजना पूर्ण क्षमतेने चालविताना अनेक अडचणी येत आहेत. तलावातून पाणी सोडल्यास जलवाहिनी आणि त्यासाठी टाकलेल्या काँक्रिटमध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरू होते. त्यामुळे सायफनने पाणी पुढे जाण्यास अडचण होते. पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने या योजनेची ‌‘असून अडचण आणि नसून खोळंबा‌’ अशी अवस्था झाली आहे. ही अडचण लक्षात घेऊन आणि लाभधारक शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रभाकर पाटील यांनी पेड, मांजर्डे, मोराळे, गौरगाव येथील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन थेट पेड तलावावर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन जाब विचारला. गेल्या पाच वर्षांपासून या जलवाहिनीची गळती काढण्यात जलसिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना अपयश आल्याने सर्वांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रमोद शेंडगे यांच्यासह पेड, मोराळे, मांजर्डे व गौरगाव येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT