पलूसः शहरातील युवक-युवतींच्या वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पलूस पोलिसांनी रविवारी शहरातील तीन कॅफेंवर अचानक छापेमारी करून, नियमभंग करणाऱ्या कॅफे चालकांना नोटिसा बजावल्या. या कारवाईमुळे कॅफे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.
उपविभागीय पोलिस अधिकारी, तासगाव सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या पथकाने शहरातील मुख्य रस्ता तसेच महाविद्यालय परिसरातील तीन कॅफेंची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने गोपनीय केबिन उभारण्यात आल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी कॅफे मालकांना परवाना, सीसीटीव्ही यंत्रणा, ग्राहक नोंदवही आणि पार्किंग व्यवस्थेसह सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शाळा-महाविद्यालयीन वेळेत गणवेशातील अथवा 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, ग्राहकांची संपूर्ण माहिती नोंदवहीत ठेवावी आणि कॅफेमधील पडदे अथवा गोपनीय केबिन तत्काळ हटवाव्यात, असे निर्देश देण्यात आले.
सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी सांगितले की, युवक-युवती भरकटू नयेत, तसेच पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या संबंधितांना समज देऊन नोटिसा बजावण्यात आल्या असून, भविष्यात पुन्हा नियमभंग आढळल्यास कॅफे सील करणे, परवाना रद्द करणे तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी पालकांनाही, मुलांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर अनेक कॅफे चालकांनी तातडीने पडदे व केबिन काढण्यास सुरुवात केली असून काहींनी कॅफे तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.