सांगली : आयर्विन पुलाला समांतर पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या पुलावर, टिळक चौक, हरभट रस्ता या शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच एसटी महामंडळाने नवीन पुलावरून बसेस सुरू करण्यासाठी वाहतूक शाखा, बांधकाम विभागाकडे परवानगी मागितली आहे. बस वाहतूक सुरू झाल्यास वाहतुकीची कोंडी अधिकच होणार आहे. त्यामुळे नवीन पुलाची स्थिती ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
दरम्यान, या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सोमवारी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीस जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी, आरटीओ उपस्थित राहणार आहेत.
येथील आयर्विन पुलाची कालमर्यादा संपल्याने या पुलावरील अवजड वाहतूक बंद आहे. परिणामी या पुलास समांतर नवीन पूल व्हावा, अशी मागणी पुढे आली. पूल उभारण्यासंदर्भात वेगवेगळे पर्याय ठेवण्यात आले. अनेकांनी नवा पूल जुन्या पुलास समांतरच पांजरपोळ येथे काढण्यात यावा, तेथून कापड पेठमार्गे वाहतूक पुढे सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनानेही तसा प्रस्ताव तयार केला होता. मात्र त्यास कापड पेठेतील व्यापाऱ्यांसह काही राजकीय नेत्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे सध्याचा पूल तयार करण्यात आला.
नुकतेच या पुलाचे लोकार्पण झाले. त्यानंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शनिवारी सायंकाळी या मार्गावर मोठी कोंडी झाली होती. शनिवारचा बाजार व संकष्टीमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या मार्गावर अद्याप एसटी महामंडळाची बस सेवा सुरू नाही. बस वाहतूक सुरू करण्यासंदर्भात आगार प्रमुखांनी वाहतूक शाखा, बांधकाम विभाग यांच्याकडे परवानगीची मागणी केली आहे. सध्या या बसेस बायपासमार्गे जात आहेत. बस सेवा सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी आणखी वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे या पुलाची स्थिती असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे.
टिळक चौकात गर्दीचे काय?
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली तरी सर्व वाहने टिळक चौकात एकत्र येतात. तेथूनच पुलावर जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे टिळक चौकातील वाहतूक कोंडी कशी कमी करायची, हा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
भक्कम कठड्याची गरज
नवीन पूल सुरू झाल्यानंतर काही वेळातच या ठिकाणी अपघात झाला. टिळक चौकापासून सांगलीवाडीपर्यंत दोन्ही बाजूला भक्कम अशा कठड्यांची गरज आहे. अन्यथा अपघातानंतर मोठा अनर्थ घडण्याचा धोका आहे.
वाहतूक शाखेवर कामाचा ताण
शनिवारी सायंकाळी हरभट रस्त्यासह बाजारपेठेतील सर्व रस्ते कोंडीमुळे ठप्प झाले होते. नियोजनासाठी वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आले. तरीही उशिरापर्यंत कोंडी कायम होती. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या विभागावर कामाचा ताण राहणार आहे.