World Environment Day 
सांगली

World Environment Day : निसर्ग संवर्धनाची जबाबदारी सामूहिक

वाढते प्रदूषण, वृक्षतोड, पाण्याचा बेसुमार वापर चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दरवर्षी ५ जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी कोणा एकाची नव्हे, तर सामूहिक आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे.

पर्यावरणातील वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या समस्यांमुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या पर्यावरण परिषदेनंतर जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना मांडली. त्यानंतर १९७४ पासून हा दिवस जगभरात विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जात आहे.

वृक्षारोपण करणे आणि लावलेल्या झाडांचे संगोपन करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाणी व वीज बचत करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करणे यांसारख्या उपाययोजनांमुळे पर्यावरण संरक्षणाला मोठी मदत होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल राखला, तरच पुढील पिढ्यांना स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि सुरक्षित जीवनमान मिळू शकते.

पर्यावरण मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे वेगाने बदलत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. परिणामी हवामान, पर्यावरण यांचा समतोल बिघडत आहे. मानव आणि जीवजंतू यांचे जीवन सुरळीत चालण्यासाठी पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकास ही काळाची गरज आहे. यासाठी वृक्षारोपण करणे, त्यांचे जतन करणे, पाणी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
- अजित काशीद, पर्यावरणप्रेमी सांगली.
सुशिक्षित लोकांकडूनच वृक्षतोड चिंताजनक : बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. सुशिक्षित लोकांकडूनच हा उद्योग सुरू असल्याने चिंताजनक आहे. झाडांची दिवसाढवळ्या कत्तल सुरू आहे. याचे परिणाम जाणवू लागले आहेत. त्यामुळे निसर्ग संवर्धनाची कोणा एकाची नव्हे, तर सामूहिक जबाबदारी आहे.
- संजय चव्हाण, पर्यावरणप्रेमी, सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT