सांगली : महापालिकेच्या मालमत्ता अधीक्षकांनी गणेश मार्केटमधील ७० गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. महापालिकेने दुकान गाळे भाडेतत्त्वावर दिलेले असताना महापालिकेच्या परस्पर दुकानगाळ्यांची भिंत पाडून गाळे मोठे करून घेतल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला आहे. दुकान गाळ्यात केलेले बदल ५ दिवसात पूर्ववत करावेत, अन्यथा दुकान गाळे ताब्यात घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या नोटीस मागे घ्याव्यात, अशी मागणी गणेश मार्केट गाळेधारक व्यापारी असोसिएशनने केली आहे. याबाबत महापौर व आयुक्तांना निवेदन दिले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते यांनी दिली.
यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. गणेश मार्केट गाळेधारक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कोडते म्हणाले, हे दुकानगाळे लहान आहेत. माल, काऊंटर व इतर वस्तू ठेवण्यासाठी गाळे छोटे व अपुरे पडत आहेत. त्यामुळे व्यवसायाच्या सोईसाठी काही गाळेधारकांनी गाळ्याच्या मधील भिंत पाडून गाळे वाढवलेले आहेत. त्यातून महापालिकेच्या मूळ इमारतीस कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता गाळेधारकांनी घेतली आहे.
गाळेधारकांमधील अंतर्गत वादामुळे काहींनी सुडबुद्धीने तक्रार केली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेने दिलेल्या नोटीस चुकीच्या आहेत. गाळेधारकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या नोटीस मागे घ्याव्यात. दरम्यान, गाळेधारक व्यापारी असोसिएशनतर्फे महापौर व आयुक्तांना निवेदन दिले आहे, अशी माहितीही कोडते यांनी दिली. यावेळी गाळेधारक उपस्थित होते.