Ended life Pudhari Photo
सांगली

Sangli News : दीड वर्षाच्या मुलीसह आईने जीवन संपवले

मायथळ गावातील घटना

पुढारी वृत्तसेवा

जत : मायथळ (ता. जत) येथे विहिरीत बुडून गर्भवती विवाहितेसह तिच्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. नीता गजानन सोलनकर (वय २९) आणि अवनी गजानन सोलनकर (वय दीड वर्ष, दोन्ही रा. मायथळ) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. नीता या दीड महिन्याच्या गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.

नीता यांचा सुमारे तीन वर्षांपूर्वी गजानन आप्पासाहेब सोलनकर यांच्याशी विवाह झाला होता. गजानन हे खासगी वाहनचालक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री पती-पत्नीमध्ये किरकोळ कौटुंबिक कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी नीता आणि त्यांची मुलगी अवनी या विहिरीत पडल्याचे आढळून आले. कौटुंबिक वादातून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे.

घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक धसाडे, हवालदार म्हेत्रे, दौलत कोळी तसेच मंडल अधिकारी अजित बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांच्या सूचनेवरून सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने विहिरीत शोधमोहीम राबवली. रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्नांनंतर आई व मुलीचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी दोन्ही मृतदेह ओढणीने एकमेकींना बांधलेल्या अवस्थेत होते. मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय तपासणीचा अहवाल आणि पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

रेस्क्यू पथकाची तातडीने धाव

उमदी पोलिसांच्या आवाहनानंतर सांगली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू फोर्सचे सीनियर कमांडर कैलास वडर, कमांडर महेश गव्हाणे, सागर जाधव, आमिर नदाफ, इर्शाद कवठेकर, आसिफ मकानदार आणि लहू घोरपडे यांच्या पथकाने विहिरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

सासूला मारहाण; पती फरार

घटनेची बातमी पसरताच संतप्त नातेवाईकांनी नीता यांची सासू रखूबाई आप्पासाहेब सोलनकर यांना मारहाण केल्याचे समजते. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेला पती गजानन सोलनकर तेथून निघून गेला. तो फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT