आष्टा : ड्रग्जप्रकरणी आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत आवाज उठविला.  
सांगली

Jayant Patil : तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात

आमदार जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : महाराष्ट्रात ड्रग्जचे जाळे सर्वच जिल्ह्यांमध्ये पसरले असून तरुणाई या भयंकर विळख्यात अडकत चालली आहे. यावर तीव्र चिंता व्यक्त करत, आष्टा शहरात घडलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा दाखला देत आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत गृह विभागाच्या आणि पोलिसांच्या संशयास्पद कार्यपद्धतीवर कडक शब्दांत प्रहार केला. आष्ट्यात पोलिसांनी आठ जणांना ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतले असताना, केवळ दोघांवर गुन्हा नोंदवून मुख्य सूत्रधारांसह सहा जणांना सोडून देण्यात आले, असा खळबळजनक आरोप आमदार पाटील यांनी केला.

विधानसभेत आष्टा येथील प्रकरणाचा पर्दाफाश करताना आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘आष्टा शहरात ड्रग्जप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. मात्र, पोलिसांनी शेवटी केवळ दोघांवर गुन्हा नोंदवला आणि उरलेल्या सहा जणांना सोडून दिले. स्थानिक पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नकळत हे 'अर्थपूर्ण' उद्योग खालच्या पातळीवर चालतात. मुख्य आरोपी आणि ऑपरेटर्सना बाजूला सारून पोलिसांकडून ड्रग्ज माफियांचे रक्षण केले जात आहे.’ यावेळी त्यांनी राज्यातील पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सर्वच पोलिस भ्रष्ट नसले, तरी सध्या काही पोलिस ठाण्यांसाठी अमली पदार्थांची तस्करी हा 'उत्पन्नाचा मार्ग' बनला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

जे पोलिस ड्रग्जच्या गुन्ह्यांना पाठीशी घालतील, त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फ करा, असे टार्गेट पोलिस विभागाला देण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केली. नार्कोटिक्स सेलचे काम कुठेच दिसत नसल्याचे सांगत त्यांनी हा विभाग सक्रिय करण्याची गरज व्यक्त केली.

तरुणांमध्ये ड्रग्जची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे सांगताना त्यांनी ऑनलाईन विक्रीकडे लक्ष वेधले. तरुणांच्या ग्रुपमधील लिंक वापरून ऑनलाईन ड्रग्ज मागवले जाते. देशात आता झटपट पैसे कमावण्यासाठी लोक घरातच अमली पदार्थांची शेती करू लागले आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यासंदर्भात आपण स्वतः आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे माहिती आणि पुरावे सोपवले असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले.

खाकीच्या आडून ड्रग्जचे 'काळे' धंदे कधी थांबणार?

पाटील म्हणाले, आष्टा येथील घटना ही केवळ हिमनगाचे एक टोक आहे. ज्या पोलिसांवर समाज रक्षणाची जबाबदारी आहे, तेच जर पैशांच्या हव्यासापोटी संशयितांना सोडून देत असतील, तर गुन्हेगारांचे मनोबल वाढणारच. पोलिसांची ही हलगर्जीपणाची भूमिका महाराष्ट्राला अंध:कारात ढकलत आहे. आष्ट्यातील त्या ६ संशयितांना कुणाच्या दबावाखाली किंवा कशामुळे सोडण्यात आले, याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. गृहखात्याने आता खाकी वर्दीला लागलेला हा 'ड्रग्जचा डाग' पुसण्यासाठी कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे.

नशेखोरीसंदर्भात ‘पुढारी’ने वेधले लक्ष

सांगली शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन माध्यमातून नशेखोरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’ने गेल्या काही दिवसापासून सातत्याने आवाज उठवला आहे. त्याची दखल घेत आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला. याची गंभीर दखल राज्य सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आता याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार, याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दररोज आढावा घ्यावा...

पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे भविष्य असणारी तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालल्याची भीती व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः रोज सकाळी १५ ते २० मिनिटे वेळ काढून राज्यातील ड्रग्जविरोधी मोहिमेचा आढावा घ्यावा. तसेच ज्या बंदरांवर सतत ड्रग्ज सापडते, तिथे महाराष्ट्र पोलिसांनी जाऊन पाळत ठेवली पाहिजे, जेणेकरून राज्यात येणारा माल रोखता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT