कुपवाड : तानंग (ता. मिरज) येथील रावळ ट्रान्सपोर्टमधून पाटणा (बिहार) येथे पाठवण्यात आलेला 78 लाख 66 हजार 695 रुपयांचा बेदाणा व 6 लाख 56 हजार 638 रुपयांचा काजू असा एकूण 85 लाख 23 हजार 333 रुपयांचा माल ट्रकमालक व चालकाने परस्पर विकून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रितेश बाबूलाल रावळ (रा. व्यंकटेशतीर्थ सोसायटी, धामणी रोड, सांगली) यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रकमालक महंमद जरार खान आणि चालक जफरुन हुसेन कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा केला आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी संशयित ट्रकमालक महंमद खान (यांचा पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही.) यांनी रितेश रावळ यांना फोन करून, ‘आमचा चालक नागपूर महामार्गावर मोकळा ट्रक उभा करून पसार झाला आहे,’ अशी माहिती दिली. संशयित ट्रकमालक महंमद खान आणि चालक जफरुन कुरेशी या दोघांनी संगनमत करून पाटणा येथे माल न पोहोचवता तो परस्पर विकून किंवा स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
15 मे रोजी ट्रक रवाना झालेला...
मिळालेल्या माहितीनुसार, तानंग येथील पंढरपूर रस्त्यालगत रितेश रावळ यांची रावळ ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी आहे. या ट्रान्सपोर्टमधून बेदाणा व काजूचा माल पाटणा येथे पाठवायचा होता. हा माल घेऊन जाण्यासाठी संशयित ट्रकमालक महंमद खान यांचा ट्रक ( यूपी 70 जीटी 0284) आणि चालक जफरुन कुरेशी हे शुक्रवारी (दि. 15) ट्रान्सपोर्टवर आले होते. रात्री आठच्या सुमारास ट्रकमध्ये माल भरून तो पाटणाकडे रवाना करण्यात आला.