Arrested Pudhari
सांगली

Sangli Crime : मित्राच्या मदतीने स्वतःच्याच घरी चोरी; सांगली एलसीबीकडून दोघांना अटक

साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : घरचे लोक कामासाठी बाहेर गेल्याची संधी साधून स्वतःच्याच घरात मित्राच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या संशयिताला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. या कारवाईत त्याच्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून ३४ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह आयफोन व अन्य साहित्य असा एकूण ७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दीपेश बाळासाहेब पाटील (वय २५) आणि महेशकुमार खंडेराव पाटील (वय ३९, दोघे रा. बिसुर, ता. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

बिसुर येथील फिर्यादी दीपश्री बाळासाहेब पाटील या ११ जुलै रोजी दुपारी कामाच्या निमित्ताने घराबाहेर गेल्या होत्या. या वेळी चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी उघडून बेडरूममध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक तुषार दोषी व अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत होते.

यादरम्यान पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपेश पाटील व महेशकुमार पाटील हे चोरीचे सोने विकण्यासाठी सांगलीतील कॉलेज कॉर्नर जवळील एका हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने हॉटेल परिसरात पाळत ठेवून, संशयास्पदरीत्या थांबलेल्या या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३४ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, दोन अंगठ्या, दोन मोबाईल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अंगझडतीत गुपित उघड

पोलिस पथकाने पंचांसमक्ष संशयित दीपेश पाटील याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याची चैन व दोन अंगठ्या सापडल्या. या दागिन्यांबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसांपूर्वी घरातील सर्वजण बाहेर गेले असताना, त्याने स्वतःच्या घराचा दरवाजा उघडून मित्र महेशकुमार याच्या मदतीने कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्याचे कबूल केले. संशयित दीपेश पाटील व महेशकुमार पाटील हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीही शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT