कॉलेज कॉर्नर ते कुमठे फाटा रस्ता रुंदीकरण वादाच्या भोवऱ्यात 
सांगली

Sangli News : रस्त्यामुळे सोय नाही, गैरसोयच होणार

कॉलेज कॉर्नर ते कुमठे फाटा रस्ता रुंदीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जा आणि नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली

पुढारी वृत्तसेवा

ॲड. शिवाजी कांबळे

माधवनगर : कॉलेज कॉर्नर ते कुमठे फाटा दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांच्या सोयीचे ठरण्याऐवजी गैरसोयीचे बनत चालले आहे. रस्त्याची उंची एक ते दीड फूट वाढवल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याकडेची घरे आणि दुकानांमध्ये शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. या मार्गावर काही ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंदिस्त गटारींचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, पाण्याचा निचरा होण्याऐवजी पाणी साचून राहण्याची दाट शक्यता आहे.

या रस्त्यावरील गटारींची लांबी-रुंदी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अपुरी आहे. तसेच त्यांची उंची आणि लेव्हल एकसमान नाही. अनेक ठिकाणी गटारी रस्त्याच्या वर तर काही ठिकाणी रेषेच्या खाली गेल्या आहेत. बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे अनेक ठिकाणचे स्लॅब काही तासांतच खचले आहेत. माधवनगर जकात नाक्याजवळ बांधलेल्या गटारीवरून एक वाहन गेल्याने स्लॅब कोसळून सुमारे तीन फूट गटार उघडी पडली आहे. परिणामी, नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.

गटारीचे काम एका रेषेत झालेले नाही. आडवे येणारे खांब किंवा झाडे वाचवण्यासाठी गटारींना जागोजागी वळणे देण्यात आली आहेत. बुधगाव ते माधवनगर दरम्यान एका कार्यालयाबाहेर झाडांमुळे गटार चक्क १० फूट वळवावी लागली आहे. याशिवाय, माधवनगर येथे राणा प्रताप चौक ते जकात नाका दरम्यान काही वर्षांपूर्वी सुमारे १ कोटी २० लाख रुपये खर्चून बांधलेली गटार आता थेट रस्त्याच्या मध्यभागी येत असल्याने हा कोट्यवधींचा निधी वाया जाण्याची चिन्हे आहेत.

रस्त्याची रुंदी ठरतेय जीवघेणी; विहिरींमुळे अपघाताचा धोका

सांगली कॉलेज कॉर्नर ते माधवनगर जकात नाक्यादरम्यान रस्ता रुंद आहे, मात्र त्यापुढे बुधगाव कॉलेजपर्यंत तो अचानक अरुंद होतो. माधवनगर गावात रस्त्याची रुंदी एका बाजूला तब्बल १५ फुटांनी कमी झाली आहे. वसंतदादा कारखाना परिसरात रस्त्याकडेच्या दुकान गाळ्यांमुळे रस्ता अरुंद झाला असून, या गाळ्यांच्या पायऱ्यांलगतच गटार बांधण्यात आली आहे. एका बड्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी कारखाना आणि जकात नाका परिसरात गाळे बांधून ते भाड्याने दिल्याची परिसरात चर्चा आहे.

तसेच सांगली बायपास आणि माधवनगर-बुधगाव दरम्यान असणाऱ्या लोखंडी पुलाची रुंदी जुनीच ठेवण्यात आल्याने या पुलापाशी रस्ता आणखी अरुंद झाला आहे. या मार्गावर बुधगाव व कवलापूर येथे रस्त्याला लागूनच तीन विहिरी आहेत. या विहिरी न बुजवताच रस्ता तयार केल्याने येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चांगला रस्ता खोदून तो विनाकारण उंच करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT