सांगली : गॅस टंचाई वाढल्याने आता जवळपास कालबाह्य होत चाललेल्या मातीच्या चुलींना मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही पुन्हा मातीच्या चुलींना पसंती दिली जात आहे. यामुळे चुलीच्या किमती जवळपास 25 ते 30 टक्क्यांनी महागल्या आहेत.
सांगली, सांगलीवाडीसह आजुबाजूच्या कुंभार कारागीरांना यामुळे उभारी मिळू लागली आहे. पारंपरिक पद्धतीने माती व शेणापासून बनविल्या जाणाऱ्या चुलींना मोठी मागणी आहे. घरगुती चूल (सिंगल) 300 रुपयांपासून ते 350, तर वाईलीसह चुलीच्या किमती 450 ते 500 रुपयापर्यंत आहेत. हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठी चूल 700 ते एक हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत. गॅस टंचाईमुळे अनेकांना आता चुलीची गरज भासत आहे.