Leopard Rescue 
सांगली

Sangli News : ‘तो’ बिबट्या नैसर्गिक अधिवासात मुक्त!

भक्ष्यासाठी शहरात घुसला असण्याची शक्यता; बिबट्याची पूर्ण वाढ झालेली नाही

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : येथील उरुण नागरी वस्तीत सोमवारी सकाळी घुसलेल्या एका मादी बिबट्याला वन विभागाने सहा तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सुरक्षितरित्या जेरबंद केले. वन विभागाच्या पथकाने भुलीचे इंजेक्शन देऊन या बिबट्याला पकडले. त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री पटल्यानंतर, त्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या मोहिमेत बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

हा मादी जातीचा बिबट्या अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाचा असून त्याची पूर्ण वाढ झालेली नाही, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वंजारी यांनी दिली. उरुण परिसराला लागून मोठ्या प्रमाणावर उसाची शेती आहे. तसेच येथील आंबेडकर नाका परिसरात शहराचे सांडपाणी जमा होते, जिथे भटक्या कुत्र्यांची मोठी संख्या असते. याच कुत्र्यांचा भक्षाच्या शोधात पाठलाग करताना हा बिबट्या लोकवस्तीत घुसला असावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बिबट्या पकडल्यानंतर तासाभरातच शुद्धीवर आला होता. दरम्यान, या परिसरात बिबट्या घुसल्याने शहरात एकच खळबळ माजली होती आणि नागरिकांमध्ये अजूनही काहीसे भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील शेतात यापूर्वीही अनेकवेळा शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले असल्याने, येथे आणखी बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही मोहीम वनसंरक्षक सागर गवते, उपवनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बिबट्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यासाठी वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, कुंभार, वनपाल डी. व्ही. बर्गे, वनरक्षक भिवा कोळेकर, हणमंत पाटील, दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर, अमोल माळी, अमोल साठे, प्राणी मित्र युनुस मनेर तसेच रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT