सांगली : राज्यमार्ग हायफाय करण्याचे काम सुरू आहे. कुमठे फाट्यापासून सुरुवात झालेला हा नूतनीकरणाचा घाट रोज हजारो वाहनधारकांच्या सोयीचा तर होत नाहीच, पण रोज प्रचंड मनस्ताप देणारा मात्र ठरतो आहे. अर्धवट कामांमुळे चौका-चौकात ट्रॅफिक जाम आणि लांबच्या लांब रांगेत उभी असलेली वाहने, हे चित्र रोजच सकाळपासून रात्रीपर्यंत दिसते आहे.
माधवनगर ते सांगली कॉलेज कॉर्नरपर्यंतचा टप्पा तर जीवघेणा झाला आहे. महिनो न् महिने काम रखडले आहे. मदन पाटील यांच्या पुतळ्याजवळ रस्ता येऊन थांबला आहे, तो कित्येक दिवस झाले पुढेच सरकत नाही. मोठमोठ्या मशिनरी गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता अडवून बसल्या आहेत. त्या हलणार कधी आणि रस्ता पूर्ण होणार कधी, असा संतप्त सवाल रोज हजारो वाहनधारकांना पडतो आहे, पण त्याचे उत्तर द्यायला जागेवर कुणीही नाही. काही ठिकाणी रस्ते जोडलेच गेले नाहीत. मग लोकांनीच खडी, दगड, माती टाकून क्रॉसिंगची सोय करून घेतली आहे. नेमके कोठे क्रॉसिंग आहे, कुठून गाड्या मुख्य रस्त्यावर येणार आहेत याचा अंदाजच येत नसल्याने अनेक लहानसहान अपघात रोज घडत आहेत.