सांगली : सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवर (कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत) आज, ४ जून ते ८ जून या कालावधीत उपसाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे आणि ते पुरवून वापरणे अत्यावश्यक असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ मधील कलम ११ आणि ४९ मधील तरतुदींनुसार हा उपसाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यादरम्यान कृष्णा नदीमधून शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या, तसेच बिगरसिंचन म्हणजेच औद्योगिक कारणास्तव सुरू असलेल्या सर्व योजनांवर पूर्णपणे बंदी असेल.
या उपसाबंदीच्या काळात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजना मात्र पूर्ववत सुरू राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सद्यस्थिती आणि प्राप्त परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सांडपाणी नदीत सोडू नका
धरणातील मर्यादित पाणी साठयाचा विचार करून बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी / औद्योगिक वापरातील पाणी, थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने, सर्व संबंधीतांनी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळण्यास सहकार्य करावे.
...अन्यथा परवाना रद्द
पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खासगी) कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनअधिकृत समजून, संबधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरिता रद्द केला जाईल. उपसा संच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने आदेशात म्हटले आहे.