शिराळा शहर : जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्साहात खरीप पेरण्यांना सुरुवात केली होती. तालुक्यात सुमारे ७० टक्के भात पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.
भाताच्या उगवणीसाठी अत्यावश्यक असलेला पाऊस न पडल्याने अनेक ठिकाणी उगवण अपुरी राहिली असून शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागातील गावांमध्ये भात पेरणी मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे. काही शेतांमध्ये भाताची उगवण झाली असली तरी पावसाअभावी रोपे पिवळी पडू लागली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी विहिरी, बोअरवेल आणि नदीच्या पाण्याचा वापर करून उगवण वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र सर्वच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
भात पिकाच्या उगवणीसाठी पेरणीनंतर सातत्याने ओलावा आवश्यक असतो. पाऊस लांबल्यास बियाणांची उगवण कमी होते, काही ठिकाणी पुन्हा पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय सोयाबीन, मका, भुईमूग आणि नाचणी यांसारख्या पिकांनाही ओलाव्याअभावी फटका बसू लागला आहे.
तालुक्यातील ४९ पैकी २५ तलावांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आंतरमशागत, तणनियंत्रण आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी, शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत.