सांगली : सांगली जिल्ह्यास 1 लाख 32 हजार लिटर रॉकेल मंजूर झाले आहे. जिल्ह्यातील पलूस आणि तासगाव या तालुक्यांमध्ये या रॉकेलचे बुधवारपासून प्रत्यक्ष वितरण सुरु करण्यात आले. उर्वरित तालुक्यांमध्येही वितरण व्यवस्था अंतिम टप्प्यात असून लवकरच वाटप सुरू करण्यात येत असल्याची माहिती सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी दिली.
प्रत्येक पात्र कुटुंबाला, शिधापत्रिकेला 3 लिटर रॉकेल वितरित करण्यात येत आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना या वितरणात मुख्य प्राधान्य देण्यात येत आहे. रॉकेलच्या उपलब्धतेनुसार आणि प्रतिसादानुसार पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही रॉकेल वितरीत करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही, त्यांनाही उपलब्धतेनुसार रॉकेल वितरण केले जाईल. यासाठी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. जिल्ह्यात आलेले स्थलांतरित मजूरदेखील केरोसीन मिळण्यास पात्र राहतील. यासाठी केंद्र किंवा राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. रॉकेलचा कोटा हा सांगली जिल्ह्यासाठी कमी प्रमाणात प्राप्त झालेला असल्याने वितरण वाटप प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार केवळ अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध असेपर्यंत करण्यात येईल.
पात्र लाभार्थ्यंनी रास्त भाव दुकानातून, परवानाधारक वितरकाकडून प्रशासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत रॉकेल घ्यावे. दर निश्चितीबाबत शासनाकडून स्वतंत्र आदेश येणार आहे. तोपर्यंत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी अशिष फुलूके, रूपाली सोळंके, अन्नधान्य विभागाचे निरीक्षक राजू कदम यांनी केले आहे.