जत महावितरणवर ‘हलगीनाद’ आंदोलन 
सांगली

Sangli News : जत महावितरणवर ‘हलगीनाद’ आंदोलन

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात अधिकारी धारेवर

पुढारी वृत्तसेवा

जत : शहरात ग्राहकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर, मीटरची वाढीव वीजबिले आणि महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात जत महावितरण कार्यालयासमोर 'हलगीनाद' धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय दलित पँथर सेना व कम्युनिस्ट पक्षाच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. या वेळी महावितरण प्रशासनाचा निषेध करत वीजबिलांची होळी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार, कम्युनिस्ट पक्षाचे समीर नदाफ, नवनाथ पवार आणि हणमंत कोळी यांनी केले. आंदोलनकर्त्यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, जत शहरात नागरिकांची पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे व सक्तीने स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. या नवीन मीटरमुळे पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाढीव वीजबिल येत असल्याने सर्वसामान्य नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. ही जबरदस्तीने बसविण्यात आलेली सर्व स्मार्ट मीटर तत्काळ काढून घेण्यात यावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी अतुल एवळे, रहीम मुल्ला, तानाजी कटरे, महादेव माळी, अंकुश कांबळे, बाळू कांबळे, महेश कांबळे, अविसाहेब नदाफ यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT