शशिकांत शिंदे
सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भेसळखोरांविरोधात राज्यभर कारवाईचा धडाका लावला आहे. गुळामध्ये साखर आणि रंगाचे मिश्रण असल्याने काही ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या धडक मोहिमेचा थेट फटका सांगलीतील प्रसिद्ध गूळ बाजाराला बसला आहे. मुंढे यांच्या कारवाईच्या धसक्यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकच्या व्यापाऱ्यांनी सांगलीतून गूळ मागवणे बंद केले आहे. परिणामी, गेल्या चार दिवसांपासून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुळाचे सौदे पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
सांगली बाजार समितीत दररोज सरासरी १० हजारावर गूळ रव्यांची आवक होते. या व्यापारात सुमारे १०० खरेदीदार आणि अडते सक्रिय आहेत. मात्र, मागणीच नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना, सध्या तरी बाजारात गूळ न आणण्याचे आवाहन केले आहे. सौदे बंद झाल्यामुळे या बाजारावर अवलंबून असलेल्या ४०० हमाल आणि तोलाईदारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बाजार समितीला मिळणारा रोजचा सुमारे ५० हजार रुपयांचा करही बुडत आहे.
सांगली बाजार समितीत येणारा बहुतांश गूळ हा कर्नाटकातून येतो. मात्र, महाराष्ट्रातील कडक कारवाई पाहता कर्नाटकातील व्यापाऱ्यांनी आता हा गूळ महाराष्ट्राऐवजी थेट गुजरात आणि इतर राज्यांत पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सांगलीतील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.