सांगली : सांगली मुख्यालयातील जलसंपदा विभागाची तीन महत्त्वाची कार्यालये इतरत्र स्थलांतरित करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू होताच, या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत दीडशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून प्रत्यक्ष काम बंद आंदोलन सुरू केले. सकाळपासूनच आंदोलक कर्मचाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यालयासमोरच जोरदार ठिय्या मारला. हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा, प्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या आदेशानुसार सांगली मुख्यालयातील ताकारी, म्हैसाळ , टेंभू उपसा सिंचन प्रकल्प ही कार्यालये अनुक्रमे कवठेमहांकाळ, जत आणि विटा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार त्या-त्या ठिकाणी नवीन कार्यालये सुरू करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर गतिमान झाल्या आहेत. मात्र, या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या निर्णयाविरोधात सोमवारपासून सुरू झालेल्या आक्रमक आंदोलनात सुनील शिंदे, सुनील चौगुले, संजय पाटील, शीतल डब्बू, वर्षा पेंडे, पुष्पा कदम, प्रदीप पाटील, झाकीर तांबोळी, जालिंदर पाटील, जितेंद्र तारळेकर, गणेश जोशी यांच्यासह जलसंपदा विभागातील सर्व स्तरांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याशिवाय मागण्यांचे निवेदन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच अचानक बदल्यांचे आदेश निघाल्यामुळे सांगली, मिरज परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. कवठेमहांकाळ, जत किंवा विटा या ठिकाणी अचानक स्थलांतर करावे लागल्याने घरभाडे, मुलांचे शिक्षण, रोजचा प्रवास खर्च आणि दुहेरी निवास व्यवस्थेमुळे कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात मोठा आर्थिक फटका बसणार आहे.