आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सांगली यांच्या नावे असलेल्या गट क्रमांक 103 मधून अज्ञात व्यक्तीने शासकीय जागेतील मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 8 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 1.22 वाजण्याच्या सुमारास पोखर्णी गट क्र. 103 मधून एक पिवळ्या रंगाचा, नंबर नसलेला जेसीबी वापरून मुरूमाचे उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी 93 हजार 500 रुपये किमतीच्या एकूण 55 ब्रास मुरूमाचे उत्खनन झाल्याचे आढळून आले.
यावेळी तोडकर यांनी जेसीबी चालकाला काम थांबविण्यास सांगितल्यावर, तो जेसीबी जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत पोखर्णी गावाच्या दिशेने पळून गेला. या घटनेचा पंचनामा प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व मंडल अधिकारी विजय तोडकर यांच्या उपस्थितीत तलाठी ऋषिकेश टकले यांनी केला. जेसीबी व अन्य वाहने जप्त करण्यात आली आहेत. याबाबत कोरेगावचे मंडल अधिकारी विजय तोडकर यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.