सांगली : चिंतामणीनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर (नगर भूमापन क्र. ५००६ बी/७) माजी नगरसेवक शीतल जिनगोंडा पाटील यांनी अतिक्रमण केले असून ते काढून खुला भूखंड विकसित करावा, अशी मागणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजितकुमार काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्रारीत केली आहे. त्यावर नगररचना विभागाचे सहायक संचालक हणमंत मारनूर यांनी शीतल पाटील यांना नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागवला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष काटे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चिंतामणीनगर येथील ओपन स्पेस १४१२.५० चौरस मीटरचा आहे. त्यावर आयुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका धारक म्हणून सिटी सर्व्हेला नोंद आहे. या खुल्या भूखंडावर माजी नगरसेवक शीतल जिनगोंडा पाटील यांनी त्यांच्या सोयीनुसार पंधरा दिवसापूर्वी तारेचे कंपाउंड घातलेले असून झाडेही त्यांच्या सोयीनुसार लावलेली आहेत व महापालिका मालकीच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे. त्यांची ही कृती महापालिकेच्या मालकीचा ओपन स्पेस बळकावण्याची असून ते ताबडतोब थांबणे गरजेचे आहे. परिसरातील नागरिकांना हा खुला भूखंड खुला करून द्यावा. खेळण्याचे मैदान, गार्डन, चिल्ड्रन पार्क, विरंगुळा केंद्र, वॉकिंग ट्रॅक विकसित करावा.
दरम्यान, काटे यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या नगररचना विभागाच्या आरेखकांनी समक्ष पाहणी केली. या खुल्या भूखंडाला जाळीचे कुंपण भिंत असून झाडे लावलेली दिसून आली आहेत. तरी याबाबत सात दिवसात खुलासा करावा. या मुदतीत कोणतीही कागदपत्रे अथवा खुलासा आपणाकडून प्राप्त न झाल्यास आपले काही म्हणणे नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे.