वाळवा : वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यासमोर गेल्या ५१ दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन सोमवारी स्थगित करण्यात आले. याबाबतची घोषणा आंदोलनाचे नेते किरण नायकवडी यांनी केली.
कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी कारखान्यावरील साडेचारशे कोटींचे कर्ज भागवून राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. पुढील दोन महिने आंदोलन थांबवून सर्वांनी मिळून आगामी गळीत हंगाम यशस्वी करूया, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
या प्रसंगी केदार नायकवडी म्हणाले, कारखान्याचे विस्तारीकरण केल्याशिवाय आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही. त्यामुळे विस्तारीकरण करून जास्तीत जास्त उसाचे गाळप केले पाहिजे. यंदा साडेपाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापुढे काटेकोर आर्थिक नियोजनासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. अध्यक्षांनी कर्जाचा डोंगर उभा केल्यामुळे गेल्या वर्षी कारखान्याने ५१ कोटी रुपये केवळ व्याज भरले आहे; म्हणजेच दिवसाला १४ लाख रुपये व्याजापोटी गेले आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत आपल्याला कारखाना चालवावा लागणार आहे.
या मेळाव्याला १५ गावांतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संदेश कांबळे, उमेश घोरपडे, अरुण यादव, विक्रम शिंदे आणि विजय पाटील यांचीही भाषणे झाली. या प्रसंगी भगवान पाटील, बाळासाहेब पाटील, वसंत वाजे, सावकार कदम, संजय अहिर, ॲड. अशोक पाटील, ॲड. वरुण माने, माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
नागनाथअण्णांचा पुतळा उभा करूया...
गौरव नायकवडी म्हणाले, प्रशासनाने वेळेत लक्ष दिले असते, तर कारखाना अडचणीत आला नसता. यामुळे हुतात्मा संकुल १५ वर्षे मागे गेले आहे. येथे कार्यकर्ते, शेतकरी आणि सभासदांना किंमत दिली गेली नाही. कारखान्यात सापडलेला साखरेचा साठा गेल्या दोन वर्षांतील असून संचालकांनी साथ दिल्यामुळेच अनेक गोष्टी बाहेर आल्या आहेत. यापुढे आपण सारे मिळून लवकरच क्रांतिवीर नागनाथअण्णांचा पुतळा उभा करूया, परंतु त्याआधी हंगाम यशस्वी करूया.