वाळवा : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांतून उभ्या राहिलेल्या वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिमेट्रिक टन ३ हजार ९०८ रुपये ऊसदर देण्याची घोषणा केली आहे. अन्य कारखान्यांनी त्यावेळच्या परिस्थितीनुसार ऊसदर वाढविल्यास हुतात्मा कारखानाही त्याप्रमाणे दर देईल, अशी ग्वाही कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक किरण नायकवडी यांनी दिली. वाळवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
किरण नायकवडी म्हणाले, कारखान्याने यंदा सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजअखेर एक लाख ४३ हजार २१० टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी १०.५० टक्के साखर उताऱ्याने एक लाख ४३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हुतात्मा कारखान्याने सातत्याने ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देण्याची परंपरा जपली आहे.
बँकांकडून मिळणारी उचल, साखरेचा उत्पादन खर्च, तोडणी-वाहतूक खर्च, देखभाल-दुरुस्ती आणि बँकांचे व्याज या सर्व बाबींचा मेळ घालून ऊसदर देताना आर्थिक नियोजन करणे कठीण होत आहे. केंद्र सरकारने साखर कारखानदारीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर वाढवून तो प्रतिकिलो ५० रुपये करावा, तसेच एफआरपी ही साखरेच्या सरासरी विक्री दराशी निगडित असावी, तरच साखर कारखानदारी टिकू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा जयश्री अहिर, उपाध्यक्ष रामचंद्र भाडलकर, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार, संचालिका विशाखा कदम, वैशाली मोहिते आदी उपस्थित होते.
आर्थिक कोंडी सोडविणार : गौरव नायकवडी
यापूर्वीच्या अध्यक्षांनी कारखान्यावर कोट्यवधी रुपयांच्या थकीत व न फिरणाऱ्या कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. त्यामुळे कारखान्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या असून, कर्जाचे व्याज आणि हप्ते भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे. अन्यथा प्रतिटन चार हजार रुपये ऊसदर देऊन ही आर्थिक कोंडी फोडली असती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आव्हान स्वीकारून कारखान्याची जबाबदारी घेतली असून, येत्या दोन वर्षांत कारखाना पूर्वस्थितीत आणल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम निर्धार गौरव नायकवडी यांनी व्यक्त केला.
पुन्हा 'हुतात्मा पॅटर्न': केदार नायकवडी
क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी मोठ्या संघर्षातून हुतात्मा कारखान्याची स्थापना केली. अत्यंत कमी कार्यक्षेत्र असतानाही 'हुतात्मा पॅटर्न'च्या माध्यमातून या कारखान्याने देशभर नावलौकिक मिळविला होता. कारखान्याचा हाच गतवैभव व लौकिक पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे केदार नायकवडी यांनी यावेळी सांगितले.