आटपाडी : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या तस्करीवर आटपाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तडवळे ते बनपुरी रस्त्यावरील बनपुरी फाटा येथे बुधवार, दि. १७ रोजी दुपारी केलेल्या कारवाईत ७७ लाख ७५ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि ३० लाख रुपयांची दोन वाहने, असा एकूण १ कोटी ७ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भाऊसाहेब मधुकर जगताप (वय ३६, रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्यास आटपाडी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याचा साथीदार तेजस (पूर्ण नाव नाही, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हा घटनास्थळावरून पसार झाला असून, दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकमधून (क्र. एमएच १२ व्हीएफ ७५११) पान मसाल्याचे जांभळ्या व हिरव्या रंगातील पॅकिंगचे हजारो पाऊच, तसेच सुगंधित तंबाखूचा मोठा साठा हस्तगत केला आहे. या प्रतिबंधित मालाची किंमत ७७ लाख ७५ हजार २०० रुपये आहे. याशिवाय तस्करीसाठी वापरलेला २० लाखांचा ट्रक आणि १० लाखांची मोटार जप्त करण्यात आली आहे.
राज्यात गुटखाबंदी असतानाही बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू असल्याचे या कारवाईने पुन्हा समोर आले आहे. त्यामुळे या तस्करीमागील मोठे जाळे उघड करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई प्रमोद रोडे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहायक निरीक्षक विशेद्रसिंह बायस करीत आहेत.