सांगली : सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिला. धरण पाणलोट क्षेत्रासह चांदोली आणि कोयना परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली असून, तिथे चोवीस तासांत ११८ मिलिमीटर पाऊस झाला. या दमदार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीवरील सर्व प्रमुख बंधारे पाण्याखाली गेले असून सांगलीतील आयर्विन पुलापाशी कृष्णा नदीची पातळी संध्याकाळी २० फुटांवर पोहोचली.
मुसळधार पावसामुळे शिराळा तालुक्यासह जिल्ह्याचा पश्चिम भाग जलमय झाला आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना धरण क्षेत्रात तब्बल ३१९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणातील एकूण पाणीसाठा ३५.७० टीएमसी (३३.९२ टक्के) झाला आहे, तर चांदोली धरणात १६.२२ टीएमसी (४७.१५ टक्के) साठा झाला असून, वारणा धरणात एका दिवसात १.६३ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. रात्री उशिरापर्यंत धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता.
या मार्गांवरील वाहतूक बंद
नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने सांगली जिल्ह्यातील बहे (ता. वाळवा), नागठाणे (ता. पलूस), मिरज तालुक्यातील सांगली, खटाव ते नांद्रे, वारणा नदीवरील मांगले ते सावर्डे आणि समडोळी ते कोथळी हे बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. खटाव ते नांद्रे पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच नांद्रे ते ब्रह्मनाळ या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे ऐतवडे खुर्द येथील साकव पुलावर पाणी आले असून, यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम भागातील काही गावांतील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. कडेगाव तालुक्यातील वांगी येथे एक धोकादायक दगडी भिंत कोसळली; मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.