सांगली : महापालिकेच्या प्रभाग क्र. 17 मधील हनुमाननगर येथील भाजी मंडई उद्घाटन होऊनही सहा महिन्यांपासून बंद आहे. ही मंडई आता नशेखोरांचा अड्डा बनली असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे. याबाबत लोकसेवा व प्रभाग विकास कृती समितीने महापालिकेत आंदोलन करून पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी रस्त्यांवर आठवडा बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी त्या-त्या भागात वाहतुकीची कोंडी होते. वाहनधारक तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. भाजी मंडई उभारणीकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. दरम्यान, हनुमाननगर येथे भाजी मंडई उभारण्यात आली. दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी पालकमंत्री यांच्याहस्ते या मंडईचे उद्घाटन झाले. मात्र उद्घाटनानंतर सहा महिने उलटूनही मंडई कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बंद वास्तू नशेखोरांचा अड्डा बनत असल्याचा आरोप लोकसेवा व प्रभाग विकास समितीचे निमंत्रक अमर पडळकर, शहाजी भोसले यांनी केला आहे. शंभर फूटी रस्त्यावरील घाटगे-पाटील शोरूमसमोर भरणारा भाजीपाला बाजार या मंडईमध्ये स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी समितीने केली आहे.
रस्त्यावरील बाजाराचे स्थलांतर हाणून पाडले..!
भाजी मंडईच्या उद्घाटनानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील भाजी बाजार मंडईत स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिका प्रशासनाला विक्रेत्यांचे सहकार्य मिळाले नाही. विक्रेत्यांनी आंदोलन केले. त्यामुळे महापालिका प्रशासनानेही नंतर दुर्लक्ष केले. त्यामुळे ही मंडई सध्या बंद अवस्थेत आहे.