विटा : शासनाच्या जीएम पोर्टलवर कुटुंबीयांच्या नावा ने सरकारलाच साहित्य विकणाऱ्या सांगली जिल्ह्यातील पळशी (ता.खानापूर) चे ग्रामसेवक सुनील गुरव याच्या कारभाराची चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विशाल नरवाडे यांनी दिले आहेत. तसेच हा चौकशी कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित ठेवण्याचा निर्णय आज गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लघुउद्योगांना थेट सरकारी टेंडरमध्ये भाग घेण्याची संधी मिळावी या हेतूने सुरू केलेल्या शासकीय जीएम पोर्टल (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) वर पळशीचे ग्रामसेवक सुनिल अशोक गुरव याने पत्नी आणि कुटुंबीयांच्या नावे नोंदणी करून भ्रष्टाचार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सूरज अशोक निकम यांनी मार्च महिन्यात सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती.
सुनील गुरवने आपल्या पदाचा दुरूपयोग करून जीएम पोर्टल (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस)वर त्यांच्या पत्नीच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावे नोंदणी केली. त्या पोर्टलच्या माध्यमातून विविध ग्रामपंचायतींना त्याने निकृष्ठ साहित्याचा पुरवठा करून शासनाधी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. शिवाय सुनील गुरव हा कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतीत नसतो. कार्यालयीन वेळेत जीएम पोर्टलच्या माध्यमातून साहित्य खरेदी व विक्रीच्या कामात व्यस्त असतो.ज्या ज्या ग्रामपंचायतीत त्याने काम केले. त्या सर्व ग्रामपंचायतीतील दप्तरांची तपासणी करावी. त्यांच्या उद्योगाचे वर्कशॉप त्यांच्या गावी हातनूर आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये आहे.
तसेच गेली ११ वर्षे पळशी गावात नियमबाहय पध्दतीने कार्यरत आहे. त्यांना पाठीशी घालणारे राजकीय व प्रशासकीय आका कोण आहेत. याचीही चौकशी करून प्रशासनातील त्या आकासह सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून कारवाई करावी असेही निकम यांनी म्हंटले होते. याबाबत पुढारी च्या वेब पोर्टल वर १३ मार्च रोजी जीएम पोर्टलवर पत्नी-कुटुंबीयांच्या नावाने साहित्य पुरवठा; पळशीच्या ग्रामसेवकाविरोधात तक्रार या शीर्षकाच्या बातमीमधून प्रकाशझोत टाकण्या त आला होता. हा विषय आज गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाळवणी (ता.खानापूर) चे जिल्हा परिषद सदस्य हिम्मत राव जाधव यांनी उचलला.
" कुठेपर्यंत त्याला पाठीशी घालणार आहात. जर सुनील गुरव दोषी नसतील, तर जिल्हा परिषदेच्या याच सभागृहामध्ये त्यांना बोलावून इथे त्यांचा सत्कार करण्यात यावा " अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हिम्मतराव जाधव यांनी केली. हाच विषय केळावी चे जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील यांनीही लावून धरला. अखेरीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी त्याच्या कारभाराच्या सखोल चौकशीचे आदेश दिले, तसेच जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला निलंबित ठेवण्याचाही निर्णय या सभेत घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत सांगली जिल्ह्यातील एकूण आठ अधिकाऱ्यांच्या गैर कारभाराबाबत लेखी तक्रार देण्यात आली होती.