सांगलीत होणार नर्सिंग कॉलेज 
सांगली

Nursing College : सांगलीत होणार नर्सिंग कॉलेज

शासनाची मंजुरी : प्रवेश क्षमता १००, बीएस्सी नर्सिंग पदवी मिळणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील शासकीय परिचर्या पदविका (जीएनएम) नर्सिंग महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून तेथे ‘बी.एस्सी. नर्सिंग पदवी महाविद्यालय’ सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयाची क्षमता १०० विद्यार्थ्यांची असेल. ही माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.

यासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ८ जुलै २०२६ रोजी जारी केला आहे. येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवारात हे महाविद्यालय होईल. तेथेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभे केले जाईल. या पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी ३२.५७ कोटी रुपयांच्या एकूण अनावर्ती खर्चास मंजुरी दिली आहे.

येथील परिचर्या पदविका (जीएनएम) महाविद्यालयाचे रूपांतर थेट परिचर्या पदवी (बी.एस्सी. नर्सिंग) महाविद्यालयात होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. ‘अपग्रेडेशन ऑफ स्कूल्स ऑफ नर्सिंग टू कॉलेज ऑफ नर्सिंग’ या केंद्र सरकारच्या केंद्रीय योजनेंतर्गत महाविद्यालयाच्या श्रेणीवर्धनासाठी सात कोटी निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी शंभर टक्के केंद्र पुरस्कृत आहे.

कॉलेजमधील विविध प्रगत प्रयोगशाळा आणि तांत्रिक सुविधांसाठी ११ लाख रुपये मंजूर झाले आहेत. महाविद्यालयाच्या कार्यालयीन व शैक्षणिक कामकाजासाठी ४० लाख रुपये किमतीचे वाहन खरेदीस मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वाचनालय आणि नवीन पुस्तकांच्या खरेदीकरिता ४० लाख रुपये निधीची तरतूद आहे. वसंतदादा रुग्णालय आवारातील या दोन्ही इमारतींच्या बांधकामासाठी एकूण ३२.५७ कोटी व पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री व वाहनांसह ९१ लाख रुपयांचा खर्च असे एकूण ३३.४८ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.

जागतिक आरोग्य व्यवस्थेत परिचारिकांचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. सांगली हे दक्षिण महाराष्ट्राचे प्रमुख वैद्यकीय केंद्र आहे. सांगलीत बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय व्हावे, यासाठी सतत प्रयत्न सुरू होते. राज्य शासनाने आणि विशेषतः वैद्यकीय शिक्षण विभागाने या मागणीची दखल घेत सांगलीला ही मोठी भेट दिली.
सुधीर गाडगीळ, आमदार, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT