आटपाडी : आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील ग्रामदैवत गणपती मंदिरातील चांदीचे मखर व झुंबर चोरी प्रकरणाचा आटपाडी पोलिसांनी पाच दिवसात छडा लावत चार आरोपींना जेरबंद केले. चोरीस गेलेल्या चांदीच्या वस्तूंसह चोरीसाठी वापरलेल्या तीन दुचाकी असा ९ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. धार्मिक भावना दुखावणाऱ्या या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
मंदिराचे पुजारी संतोष सूर्यकांत देशपांडे (वय ४०, रा. गोमेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपासात मारुती अशोक गुजले (रा. खानापूर), समाधान ऊर्फ पपल्या अशोक खरात, प्रतीक सचिन पवार, आदित्य नागेश मेनकुदळे आणि सतीश लक्ष्मण साळुंखे (सर्व रा. हिवतड, ता. आटपाडी) यांचा सहभाग निष्पन्न झाला. त्यापैकी चौघांना १४ जुलै रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सतीश साळुंखे फरार आहे.
तपासात आरोपींनी ८ जुलैच्या रात्री ते ९ जुलैच्या पहाटेदरम्यान गावातील ट्रान्स्फॉर्मरची वीज बंद करून मंदिराच्या ग्रीलचे कुलूप लोखंडी गजाने तोडले. त्यानंतर मंदिरात प्रवेश करून प्लायमध्ये बसविलेले अडीच किलो वजनाचे चांदीचे मखर (किंमत ५.०५ लाख रुपये) आणि एक किलो वजनाचे चांदीचे झुंबर (किंमत २.०२ लाख रुपये) उचकटून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरीमुळे गोमेवाडी गाव १० जुलै रोजी संपूर्ण बंद ठेवून निषेध व्यक्त केला होता, तर मोर्चा काढण्याचे निवेदन दिले होते. नुकतेच आटपाडी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी स्वतंत्र तपास पथकाची स्थापना केली. त्यांनी तपासाची सूत्रे स्वतःकडे ठेवत तपास करण्याच्या सूचना दिल्या.