सांगली : येथील हरिपूरमधील कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर मासेमारी करणाऱ्या शौकिनांच्या गळास तब्बल 40 किलोचा मासा लागला. इतक्या वजनाचा मासा येथे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नदीपात्रात एवढा मोठा मासा मिळणे हा एक कौतुकाचा विषय बनला आहे.
भारतीय लष्करातील एक निवृत्त मेजर रणजित गायकवाड आणि त्यांच्या मित्रांना मासेमारीची आवड आहे. मित्रांचे पथक नेहमीप्रमाणे हरिपूर येथील नदीकाठावर मासेमारी करत होते. दरम्यान, त्यांच्या गळाला एका मोठ्या माशाने झटका दिला. माशाचे वजन आणि ताकद एवढी अफाट होती, की त्याला पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी या संपूर्ण ग्रुपला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर कुशलतेने गायकवाड आणि त्यांच्या मित्रांनी या भल्या मोठ्या माशाला नदीबाहेर काढण्यात यश मिळवले. हा मासा कटला प्रजातीचा असल्याचे मासेमारी करणाऱ्यांनी सांगितले.
नदीबाहेर काढल्यानंतर या माशाचे वजन केले असता ते तब्बल 40 किलोहून अधिक भरले. कटला हा गोड्या पाण्यात राहणारा मासा मानला जातो. मात्र, सामान्यतः नदीपात्रात एवढ्या मोठ्या वजनाचा कटला मासा सापडणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. या माशाचा अवाढव्य आकार पाहता स्थानिक नागरिकांनी फोटो घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कृष्णा नदीच्या पात्रात इतका मोठा मासा मिळाल्याची बातमी हरिपूर आणि सांगली शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर स्थानिक मच्छीमार, निसर्गप्रेमी आणि गावकऱ्यांनी नदीकाठावर मासा पाहण्यासाठी गर्दी केली होती. या माशाचा दर सुमारे अडीचशे रुपये किलो आहे. यापूर्वी 30 किलोपर्यंत मासा सापडला असून, 40 किलोचा मासा सापडणे ही पहिलीच वेळ आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर येथे जैवविविधता आढळते, याचाच प्रत्यय काल या 40 किलोच्या माशाच्या रूपाने सांगलीकरांना आला आहे.