सांगली : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशमूर्तींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्लॅस्टर, रंग आणि मजुरीच्या दरात झालेल्या वाढीमुळे यावर्षी गणेशमूर्तींच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता मूर्तिकारांकडून वर्तवली जात आहे.
यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असली, तरी मूर्तिकारांची तयारी दोन महिने आधीपासूनच सुरू झाली आहे. सांगलीच्या पंचशीलनगरमध्ये गेली २० वर्षे मूर्ती तयार करणारे व्यावसायिक दिगंबर आणि संभाजी जाधव यांनी सांगितले की, सध्याच्या सततच्या पावसाळी वातावरणामुळे मूर्ती सुकवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. विशेषतः मोठ्या मूर्ती सुकवण्यासाठी मूर्तिकारांना मोठी कसरत करावी लागत आहे. मूर्ती व्यवस्थित सुकल्याशिवाय पुढील काम करणे अशक्य असल्याने सध्या त्यांची मोठी धडपड सुरू आहे. बाजारपेठेत सध्या २ फुटांपासून ते १४ फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार असून, बहुतांश मूर्तींच्या फिनिशिंगचे आणि रंगकामाचे काम वेगाने सुरू आहे. काही मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले असले, तरी दमट व पावसाळी हवामानामुळे कामाचा वेग मंदावला आहे. महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणाचा दुहेरी फटका यंदा मूर्ती व्यवसायाला बसताना दिसत आहे.