ऐतवडे खुर्द : शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी बागायती शेतकऱ्यांनी मोठी एकजूट दाखवली आहे. शेतकऱ्यांनी लेखी आक्षेप, हरकती दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 5 मे 2026 नुसार महामार्ग अधिनियम 1955 नुसार, उक्त जमिनीशी हितसंबंधित व्यक्तीचे शेतीसह यांच्या शक्तिपीठ महामार्गाविषयी सर्व लेखी आक्षेप दाखल करण्याची प्रक्रिया शेतकरी वर्गाने सुरू केली आहे. ऐतवडे खुर्द येथील सुमारे 182 एकर जमीन महामार्गासाठी जात आहे. या संबंधित शेतकऱ्यांनी एकत्रित येत या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. यामध्ये शेतीचे होणारे प्रचंड नुकसान, वारणा नदीला येणारा महापूर, महामार्ग उभारणीने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, सामाजिक दुष्परिणाम, अशा विविध गोष्टी यामध्ये नमूद केल्या आहेत. या परिसरातून महामार्गाला तीव्र विरोध होत आहे.
या हरकतींची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक रस्ते विकास महामंडळ मुंबई, सचिव नगरविकास गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वेस्टर्न झोन पुणे यांच्याहकडे पाठविण्यात येत आहेत. दरम्यान, ज्या गावांतून महामार्ग जाणार आहे त्या गावांतील सर्व शेतकऱ्यांनी महामार्ग रद्दसाठी लेखी प्रक्रिया सुरू केली आहे.
गुरुवारी विशेष ग्रामसभा
शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी ऐतवडे खुर्द येथे गुरुवारी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.