गोटखिंडीत परप्रांतिय मजुराकडून वृद्धाचा खून File Photo
सांगली

Sangli Crime : गोटखिंडीत परप्रांतिय मजुराकडून वृद्धाचा खून

विनयभंगाचा जाब विचारल्याने हल्ला

पुढारी वृत्तसेवा

आष्टा : परप्रांतीय युवकाने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत वृध्दाचा मृत्यू झाला. गोटखिंडी (ता. वाळवा) येथे बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. आष्टा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पांडुरंग गोविंद कोकाटे (वय ७३) असे मृताचे नाव आहे. राजू (पूर्ण नाव माहीत नाही) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कोकाटे यांचे तोरणबाई विहीर परिसरालगत असणाऱ्या शेतामध्ये जनावरांचे शेड आहे. ते जनावरांच्या देखभालीसाठी सहसा याच शेडमध्ये थांबून असायचे. बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास ते शेडमध्ये विश्रांती घेत होते. तेथे राजू नामक परप्रांतीय तरुणाने त्यांच्या नात्यातील महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न केला. पांडुरंग कोकाटे यांनी याबाबत राजू याला जाब विचारला. या रागातून राजू याने त्यां लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

​काही वेळानंतर कोकाटे यांचे कुटुंबीय शेतात आले असता त्यांना कोकाटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना गोटखिंडी येथील स्थानिक दवाखान्यात नेले. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी जखमी कोकाटे यांना घरी आणून आपत्कालिन रुग्णवाहिकेला माहिती दिली. परंतु, पुढील उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ​घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजू याला स्थानिक तरुणांच्या मदतीने भडकंबे रस्त्यावरील बिरोबा डोंगर परिसरात पकडण्यात आले. संशयित सहा महिन्यांपासून गोटखिंडी गावातच एका शेतकऱ्याकडे शेती कामाला होता, अशी माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT