जत : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या प्रशासकीय कामकाजाला स्थानिक पातळीवर अखेर गती मिळणार आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने जारी केलेल्या आदेशानुसार सांगली येथील “कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्र. 2” कार्यालयाचे मुख्यालय आता जत येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकृत आदेशात प्रदेश, मंडल व विभाग स्तरावरील काही कार्यालयांच्या पुनर्रचनेबाबत निर्णय घेण्यात आला. म्हैसाळ योजनेशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया, तांत्रिक कामे, शेतकऱ्यांच्या अडचणी व स्थानिक पातळीवरील समन्वय अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या जूनमध्ये हे कार्यालय जत येथे स्थलांतरित होणार आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही जतसह दुष्काळी भागातील शेतीसाठी जीवनदायिनी मानली जाते. मात्र योजनेचे विभागीय कार्यालय सांगली येथे असल्याने शेतकरी, लोकप्रतिनिधी व नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. तांत्रिक मंजुरी, कागदपत्रे, दुरुस्ती, पाणीपुरवठा समन्वय आदी कामांसाठी मोठा वेळ व खर्च होत असल्याची तक्रार सातत्याने होत होती.