कृष्णा कॅनाॅलची दुरुस्ती रखडल्याचा फटका 
सांगली

Sangli News : कृष्णा कॅनाॅलची दुरुस्ती रखडल्याचा फटका

दुधोंडीतील जि. प. मुलींच्या शाळेजवळील शेतात कोबी पिकाचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

पलूस : दुधोंडी (तालुका पलूस) कृष्णा पोटकॅनाॅलच्या दुरुस्तीचे काम अर्धवट अवस्थेत सोडल्याने आणि पाणीपुरवठा व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे दुधोंडी येथील जि. प. मुलींच्या शाळेजवळील शेतातील कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पाण्याचा अतिरिक्त निचरा झाल्याने कोबी पिकाची वाढ खुंटली असून अनेक झाडांची पाने पिवळी पडून वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा पोटकॅनाॅलच्या दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र खोदाई करून काम अर्धवट अवस्थेतच ठेवण्यात आले आहे. याचा थेट परिणाम लगतच्या शेतीवर होत असून जि.प. मुलींच्या शाळेजवळील शेतातील कोबी पीक यामुळे बाधित झाले आहे.

येथील शेतकरी राकेश तिरमारे यांचा आरोप आहे की, पाटबंधारे विभागाकडून कालव्यावरील पाण्याचे नियोजन आणि देखरेख योग्य पद्धतीने केली जात नाही. कालव्यावरील दरवाजे कोणत्याही नियंत्रणाशिवाय उघडले जात असल्याने काही वेळा पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो. दुसरीकडे, पाणी वाहून जाण्यास आवश्यक असलेल्या मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने अतिरिक्त पाणी शेतजमिनीत झिरपत राहते. नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामा करण्यात यावा, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. तसेच कृष्णा पोटकॅनाॅलच्या रखडलेल्या दुरुस्तीचे काम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT