Sangli DCC Bank 
सांगली

Sangli Bank Recruitment : जिल्हा बँकेत नोकरीसाठी १० हजारावर अर्ज

आणखी दोन दिवस मुदत असल्याने इच्छुक वाढण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कनिष्ठ लिपिक भरतीसाठी आतापर्यंत १० हजार ५०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी दोन दिवस म्हणजेच १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रियेनंतर अर्जांची छाननी, पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रे पडताळणी अशी पुढील प्रक्रिया राहील, अशी माहिती बँक प्रशासनाने दिली.

बँकेतील ४४४ कनिष्ठ लिपिक पदांसाठी २४ जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी बँक प्रशासनाने 'आयबीपीएस' (IBPS) कंपनीची निवड केली आहे. दरम्यान, २ जुलै रोजी राज्य शासनाच्या सहकार विभागाने जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचे कारण देत नोकरभरती थांबवण्याचे आदेश दिले होते. या स्थगितीविरोधात जिल्हा बँक प्रशासनाने ६ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्याच दिवशी या भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून ती सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

शासनाच्या स्थगितीच्या आदेशामुळे उमेदवारांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे बँक व्यवस्थापनाने ८ जुलै रोजी संपणारी अर्ज करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवून १० जुलै केली आहे.

बीड आणि अकोला येथे नवीन परीक्षा केंद्रे

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर परीक्षेचे नियोजन केले जाईल. यापूर्वी सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथे परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. मात्र, मराठवाडा व विदर्भातून आलेल्या अर्जांचा विचार करून प्रशासनाने आता बीड आणि अकोला येथे नवीन दोन परीक्षा केंद्रांना मंजुरी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT