वळसंग : शेड्याळ (ता. जत) येथे यात्रेदरम्यान पालखीला स्पर्श केल्याच्या कारणावरून एका दलित तरुणास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ॲट्रॉसिटी) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मडाप्पा रामू हावगोंडी, शामराव हणमंत गुगवाड आणि गणेश श्रीकांत नरूटे (सर्व रा. शेड्याळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रखमाजी रामचंद्र केंगार (वय ५४, रा. शेड्याळ) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शेड्याळ येथील मडसिद्ध मंदिराच्या यात्रेत पालखीचे दर्शन घेण्यासाठी फिर्यादींसोबत राहुल उत्तम मलकरी गेले होते. राहुल मलकरी हे देवाच्या पालखीपुढे नतमस्तक होत असताना त्यांनी पालखीला हात लावल्याचे कारण पुढे करत संशयितांनी वाद घातला.
संशयितांनी राहुल मलकरी यास जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यातील एका संशयिताने ढोलकीच्या काठीने पाठीत व छातीत मारहाण करून त्यांना जखमी केले. या घटनेनंतर संशयितांनी फिर्यादी रखमाजी केंगार यांच्या घराजवळ येऊन पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. केंगार यांच्या फिर्यादीवरून जत पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.