सांगली : दलित महासंघाचे उत्तम मोहिते (वय 41, रा. गारपीर चौक, सांगली) यांचा सांगलीत मंगळवारी रात्री उशिरा गुप्तीने भोसकून निर्घृणपणे खून झाला. यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत हल्लेखोर देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या गारपीर चौकातील घराजवळ स्टेज उभारण्यात आले होते. उत्तम मोहिते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्टेजवर असताना त्या ठिकाणी आलेल्या हल्लेखोरासोबत त्यांचा वाद झाला. या वादातून दोघात झटापट झाली. दोघांनी एकमेकांवर हल्ला केला. यावेळी संबंधित व्यक्तीने उत्तम मोहिते यांच्या छातीवर आणि पोटात गुप्तीने वार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
या घटनेनंतर मोहिते यांना उपचारासाठी तातडीने सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. यामुळे सांगली शासकीय रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. यासाठी गारपीर चौकामध्ये होते. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची व त्यांच्या हितचिंतकांची मोठी गर्दी जमली होती. गर्दी कमी झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला.