Sangli Jilha Parishad Pudhari File Photo
सांगली

Sangli News : अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची ‌‘ॲलर्जी‌’

कागदोपत्री वास्तव्य थांबणार कधी; सदस्यांतून सवाल : छापासत्र सुरू करून तपासणी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

संजय खंबाळे

सांगली ः ग्रामीण भागातील रुग्णांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवासस्थाने उभारण्यात आली. मात्र काही अपवाद वगळता अनेक निवासस्थाने आज धूळ खात पडली आहेत. यामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यात सुमारे 59 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांतून दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी ‌‘स्मार्ट पीएचसी‌’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची राज्य शासनाने दखल घेतली. लाखो रुपये खर्च करून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. बहुसंख्य वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची व्यवस्था करण्यात आली.

काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतही आहेत. दिवसभर सेवा करून नियुक्तीच्या ठिकाणी वास्तव्यही करीत आहेत. मात्र अनेकजण केवळ कागदोपत्री वास्तव्य करीत असल्याच्या तक्रारी आहेत. पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अवस्था काही वेगळी नसल्याच्या तक्रारी आहेत. काहीजण वास्तव्य करतात, मात्र अनेकजण शहरात राहतात. त्यामुळे निवासस्थानाची झाडाझडती घेण्याची मागणी आहे.

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा देता यावी आणि दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत व्हावी या उद्देशाने ही निवासस्थाने उभारली होती. मात्र अनेक ठिकाणी ही निवासस्थाने बंद आहेत, त्यांची दुरवस्था होत आहे. काही ठिकाणी निवासस्थानांचे दरवाजे-खिडक्या तुटलेल्या आहेत, तर परिसर झाडाझुडपांनी वेढला गेला आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली ही इमारत वापराअभावी पांढरा हत्ती पोसल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी शहरातून ये-जा करण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा रामभरोसे होते. पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवासस्थानांची पाहणी करून संबंधितांना तेथे राहणे सक्तीचे करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT