सांगली : रखडलेली नालेसफाई, काटकोनात वळवलेले नाले, आकार लहान केलेले व मुजवलेले नैसर्गिक नाले, नाल्यांच्या बफरझोनमधील अतिक्रमणे, पहिल्या पावसात शहरभर साचलेले पाणी, यावरून मंगळवारी महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन बैठकीत नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. नाल्यांवरील अतिक्रमणांच्या तक्रारींवरून महापौर, आयुक्त यांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, २०१९ च्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन सुधारावे, असे निर्देशही महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले.
महापालिका सभागृहात बुधवारी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक झाली. महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, समाजकल्याण सभापती गीता पवार, आयुक्त संजीता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नगरसेवक राजेश नाईक, अभिजित भोसले, युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, प्रकाश मुळके, अमित शहा, करण जामदार, उदय बेलवलकर, कीर्ती देशमुख, नसिम नाईक, वर्षा निंबाळकर, साक्षी बोरगावकर, प्रार्थना शिंदे व अन्य नगरसेवक, पोलिस अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजकल्याण सभापती गीता पवार यांनी भीमनगर, स्वस्तिक काटा परिसर, गोकुळनगर, गुरुद्वारासमोरील वस्ती आदी ठिकाणी पहिल्याच पावसात घरांत पाणी शिरल्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. नालेसफाई होत नाही. त्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी पाणी घरांत शिरते, रस्त्यांवरून वाहते, असा आरोप केला. प्रभाग क्रमांक दहामधून जाणारा नाला पुढे जुना बुधगाव रोडला गॅरेज लाईनजवळ अतिशय अरुंद झाला आहे. १५ फूंद रुंद व १८ फूट खोलीचा नाला अस्तित्वात राहिलेला नाही. याठिकाणी २ ते ३ फुटाच्या पाईप घालून नाल्याची रुंदी, खोली कमी केली आहे. त्यामुळे मागे पाण्याला फुगवटा येतो आणि भीमनगर, मीरा हौसिंग सोसायटी, नवीन वसाहत, गोकुळनगर भागात पाणी वस्तीत शिरत असल्याकडे नगरसेवक प्रकाश मुळके यांनी लक्ष वेधले. त्यावर याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाईल, असे आयुक्त महापात्र यांनी सांगितले. युवराज गायकवाड, नसिम नाईक, राजेश नाईक, अभिजित भोसले यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.
महापौर सूर्यवंशी यांनी स्पष्टपणे नमूद केले की, प्रशासन तयारी करते, परंतु जेव्हा प्रत्यक्ष पूरबाधित नागरिक निवारा केंद्रात येतात, तेव्हा त्यांचा अनुभव चांगला नसतो. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. त्याची नोंद घेऊन योग्य नियोजन करावे. स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते पूरपरिस्थितीत महापालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यांना आवश्यक साहित्य, इंधन इत्यादी सुविधा देणे आवश्यक आहे.
आयुक्त संजीता महापात्र म्हणाल्या, महापूर परिस्थिती आल्यास त्याला सामोरे जाण्यास महापालिका प्रशासन सज्ज आहे. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, अधिकारी यांच्यातील समन्वयाने काम होईल.