सांगलीत काँग्रेसचे 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह आंदोलन 
सांगली

Sangli News| राम मंदिर ट्रस्ट घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा

सांगलीत काँग्रेसची जाेरदार मागणी; 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : अयोध्येतील राम मंदिर देशवासीयांच्या योगदानातून उभे राहिले असून कथित गैरव्यवहारातील दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली. राज्यभर काँग्रेसतर्फे यासाठी आंदोलन छेडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस सेवा दल व संलग्न संघटनांच्यावतीने मिरज रोडवरील हनुमान मंदिरात 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. प्रभू श्रीरामांच्या स्तुतिपाठासह हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करून, राम मंदिर ट्रस्टमधील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी, राम मंदिर ट्रस्टमधील जे दोषी आहेत त्यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती जमा झालेली आहे. पंतप्रधान व गृहमंत्री यावर काहीच बोलत नाहीत, याचा अर्थ या भ्रष्टाचाराला त्यांची मूक संमती आहे हे सिध्द होते, असे सांगून दोषींवर कारवाई होईपर्यंत काँग्रेस शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

डॉ. सिकंदर जमादार, संदीप जाधव व अनिल मोहिते यांनीही मनोगते व्यक्त केली. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. सुभाष खोत, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, संजय मेंढे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, मालन मोहिते, करुणा सॅमसन, नंदकुमार शेळके, देशभूषण पाटील, अण्णासाहेब कोरे, पृथ्वीराज चव्हाण, बाबासाहेब कोडग, नगरसेवक हर्षवर्धन पाटील, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, अंजली जाधव, संगाप्पा पाटोळे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT