आटपाडी : वलवण (ता. आटपाडी) येथे भावकीतील जुन्या वादाने हिंसक वळण घेतल्याने दोन गटांत जोरदार मारहाण झाली. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात सागर बाळू जाधव (वय ३६, रा. वलवण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १५ जून रोजी सायंकाळी चारच्या सुमारास भावकीतील वादावरून सुधाकर तुकाराम शिंदे यांनी फोनवरून जाब विचारत त्यांना शिवीगाळ व धमकी दिली. त्यानंतर सुधाकर शिंदे यांनी सागर जाधव यांच्या घरासमोर जाऊन पुन्हा शिवीगाळ सुरू केली. यावेळी सागर यांच्या पत्नी अंकिता जाधव यांनी जाब विचारला असता त्यांना मारहाण करण्यात आली. पत्नीच्या सुटकेसाठी गेलेले सागर जाधव यांच्यावरही दगडाने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. या फिर्यादीवरून आटपाडी पोलिस ठाण्यात सुधाकर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधी गटाकडून तिघांविरोधात तक्रार
दुसऱ्या प्रकरणात सुधाकर तुकाराम शिंदे (वय ४६, रा. वलवण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, १५ जून रोजी रात्री खरसुंडीहून घरी परतत असताना कारंडे वस्ती पुलाजवळ सागर जाधव, गणेश जगन्नाथ पवळ आणि अंकिता जाधव यांनी जुन्या भांडणाच्या रागातून त्यांना अडवले. संशयितांनी त्यांना लाथाबुक्क्यांसह लोखंडी पाईप व दगडाने मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून सागर जाधव, गणेश पवळ आणि अंकिता जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.