आष्पाक आत्तार
वारणावती : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली अभयारण्य परिसरात सध्या रात्रीच्या वेळी काजव्यांची मोहक रोषणाई पाहायला मिळते. पर्यटकांसाठी हा निसर्गानुभव आनंददायी आहे. विशेषतः चांदोली धरण क्षेत्रात हजारो काजवे अंधारात लुकलुकताना दिसतात.
चांदोली परिसरात निसर्ग अभ्यासक प्रणव महाजन काजव्यांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी सांगितले की, काजवे हे भुंग्यांच्या कुळातील कीटक असून जगभरात त्यांच्या सुमारे दोन हजार प्रजाती आढळतात. भारतात केवळ नऊ ते दहा प्रजाती आढळून येतात.
पावसाळ्याच्या काळात मादी काजवा साधारण शंभर अंडी घालते. ही अंडी झाडांच्या खोडामध्ये, पाणथळ जागेजवळ किंवा उंच गवताळ भागातील पालापाचोळ्यात ठेवली जातात. काजव्यांची अंडी आणि अळी दोन्ही अंधारात चमकण्याची क्षमता ठेवतात. साधारण दोन आठवड्यांत अंड्यातून अळी बाहेर पडते आणि तिच्या संघर्षमय जीवनाची सुरुवात होते.
या अवस्थेत अळ्या विविध लहान-मोठे किडे, शेतीस हानिकारक कीटक, अळ्या तसेच गोगलगायी यांचे भक्षण करतात. वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर त्या कात टाकतात. साधारण पाच वेळा कात टाकल्यानंतर त्या कोशावस्थेत प्रवेश करतात. मे-जून महिन्यात आणि पावसाच्या काही जोरदार सरींनंतर या कोशातून लुकलुकणारे काजवे बाहेर पडतात.